काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार   

गुवाहाटी : आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात वनरक्षक आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एका संशयित शिकार्‍याचा मृत्यू झाला. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. 
 
उद्यानाच्या अगोराटोली रेंजमधील बालीदुबी कॅम्पमध्ये तैनात असलेल्या फ्रंटलाइन कर्मचार्‍यांवर शिकारी सशस्त्र हल्ला करणार असल्याची माहिती पोलिस  आणि वनविभागाला मिळाली होती. या माहितीनंतर बुधवारी रात्री पोलिस आणि वन विभागाने संयुक्त मोहीम सुरू केली. या परिसरातील सर्व वन छावण्यांना  सतर्क ठेवण्यात आले होते आणि परिसरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
 
बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास संयुक्त पथकाला धनबारी परिसराजवळ संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यावेळी शिकार्‍यांना शरण येण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी पोलिस आणि वनविभागाच्या अधिकार्‍यांवर गोळीबार केला.
 
यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जवळपास अर्धा तास दोन्ही ही चकमक सुरू होती. या चकमकीनंतर शोध मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी एक जखमी व्यक्ती आढळली. त्याला तात्काळ बोकाखत येथील स्वाहिद कमला मिरी या सरकारी रूग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरक्षा कर्मचार्‍यांनी घटनास्थळावरून एक एके-५६ रायफल आणि ११ राउंड जिवंत दारूगोळा जप्त केला.
 

Related Articles